खळबळजनक…! भावाच्या मृत्यूनंतर बहिणीनेही संपवली जीवनयात्रा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरातील तात्या टोपे नगर येथील एका घरात दोन वृद्धांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मोहनलाल ओटवाणी (८०) आणि शांता ओटवाणी (७५) असे या मृत्यू झालेल्या वृद्ध बहीण भावांचे नाव आहे. भावाच्या मृत्यूनंतर बहिणीनेही अन्नत्याग करून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा देखील मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, १५ जानेवारी रोजी नागपुरातील संध्याकाळी तात्या टोपे नगरमधील राहत्या घरी दोन वृद्ध मृतावस्थेत आढळले होते. ८० वर्षीय मोहनलाल ओटवाणी आणि त्यांची ७५ वर्षीय बहीण शांता ओटवाणी यांचे मृतदेह आतून लॉक असलेल्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्या रिपोर्टमधील माहितीनुसार मोहनलाल यांचा मृत्यू आधी झाला, तर त्यानंतर दोन दिवसांनी बहीण शांता ओटवाणी यांनी प्राण सोडले. म्हणजेच वृद्ध महिला आपल्या भावाच्या मृतदेहासोबत घरीच होत्या. बहिणीचा मृत्यू तहान-भुकेमुळे झाल्याचं समोर आले आहे. म्हणजे भावाच्या निधनामुळे धक्का बसल्यानंतर बहिणीने अन्न-पाण्याचा त्याग केल्याची शक्यता आहे.
ओटवाणी यांच्या घरी पाळीव कुत्राही मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या उत्तरीय तपासणीतही त्याचाही मृत्यू भुकेमुळे झाल्याचं कारण समोर आलं आहे. या दोन्ही भाऊ-बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये असल्याचंही समोर आलं आहे.