‘नमो अ‍ॅप’वरील ‘या’ प्रश्नामुळे भाजपा खासदारांची उडाली भंबेरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असताना राजकीय पक्षांनी ‘डावपेच’ आखायला सुरुवात केली आहे. नमो अ‍ॅपवरील एक प्रश्न खासदारांना अस्वस्थ करतो आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघातील तीन लोकप्रिय नेते कोणते, या प्रश्नानं भाजपाच्या खासदारांची भांबेरी उडाली आहे. उमेदवारी देताना नमो अ‍ॅपवरील ‘हा’ प्रश्न महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
‘पीपल्स पल्स’ सर्वेक्षण –
नमो अ‍ॅपमुळे केल्या जात असलेल्या सर्वेक्षणामुळे भाजपाच्या अनेक खासदारांची घाबरगुंडी उडाली आहे. मोदींनी ‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातील तीन प्रमुख नेत्यांची नावं सुचवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी नमो अ‍ॅपवर ‘पीपल्स पल्स’ नावानं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देताना या माहितीचा आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामुळे अनेक खासदार सध्या चिंतेत आहेत.
याबद्दल मोदींनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. ‘तुमचा अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. तुम्ही दिलेल्या अभिप्रियांमुळे अनेक निर्णय घेताना आम्हाला मदत होईल,’ असं आवाहन मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं होतं. भाजपा अध्यक्ष अमित शहांनीही ट्विटरच्या माध्यमातून अशाच प्रकारचं आवाहन केलं होतं. तुमच्या मतदारसंघातील मुद्दे थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवा, असं शहांनी म्हटलं होतं.
अधिकाधिक लोकांनी ‘नमो अ‍ॅप’वरील सर्वेक्षणात सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.