‘हे’ पुढारी लोक युवकांच्या डोक्यात राख घालताहेत : नाना पाटेकर

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक वेगवेगळ्या समाजात पुढारी म्हणवणारे युवकांच्या डोक्यात राख घातलाहेत. तुमच्या मेंदुवर ते अतिक्रमण करताहेत आणि ते तुम्ही करु देताय हे चुकीचे आहे. राजकीय अस्तीत्व संपलेली माणस उगाचच उपद्रव्य मुल्य म्हणून काहीतरी बोलत असतात, असे मत सिनेअभिनेते नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

घारेवाडी ता. कराड येथील बलशाली युवा हृदय संमेलनात रविवारी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत अभिनेते मकरंद अनासपुरे शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख, कराड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कराड मर्चंट समुहाचे सत्यनारायण मिणीयार यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाटेकर म्हणाले, पुढारी मंडळींना इतकी वर्ष तुम्ही खांद्यावर वागवले, त्यांना आता खाली उतरवले पाहिजे. कोणीही येतो, काहीही बोलतो, त्यातुन जाळपोळ सुरु होते. हे बंद झाले पाहिजे. माध्यमांनी समाजात जे काही चांगले घडत आहे, ते आज दाखवण्याची गरज आहे.

अनासपुरे म्हणाले, अलिकडे तरुणांमध्ये फोनचा सेल्फीमॅनिया सुरु झाला आहे. तो सोडुन देण्याची गरज आहे. आपले महत्व आपल्याला कळले पाहिजे आणि ते वाढलेही पाहिजे. जीवन जगताना चांगले जगा. आपण श्रीमंत आहेत, असा अनेकांचा भ्रम असतो. अनेकांकडे पैसे आहेत मात्र सुख-समाधान नाही. देशप्रेम, राष्ट्रप्रेम घोषणेत असून उपयोगाचे नाही आपल्या कृतीत ते असले पाहिजे. कुठल्याही रस्त्याला महापुरुषांची नावे देणे खुप सोपे आहे, मात्र त्यांच्या रस्त्यावर आपण चालतो का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हेलेंटाईन डे हा आपला नाही. आपल्या भारतीय संस्कृतीतील डे साजरे करा. एकही गोष्ठ न लिहीता नाना पाटेकरांच्या नावाने सोशल मिडीयावर खुप मेसेज येतात. जो माणुस सातत्याने चांगले काम करतो त्याची बदनामीची मोहिम सुरु झाली की तो माणुसच तसाच असेल असे मत तयार करायचे का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.