सोलापुरातील ‘त्या’ चिमुकल्याची हत्या नाहीच, गुप्तधनासाठी नरबळी 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर जिलह्यातील मंगळवेढ्यातील बहुचर्चित प्रतिक शिवशरण या ९ वर्षीय चिमुरड्याची हत्या निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती मात्र ही हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा प्रकार आता उघड झाला आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींची शारिरीक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी आरोपीनं प्रतीकचा नरबळी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण ?
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणाऱ्या प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे गेल्या २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात उसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह निर्घृणपणे खून करून टाकलेल्या अवस्थेत मिळून आला होता. त्याच्या डोक्याचे केस संपूर्णत: कापलेले, डावा पाय पूर्ण तोडून गायब केलेला आढळून आला होता. तेथेच हिरव्या रंगाची चोळी, बांगडय़ाही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता.
मांत्रिक अटकेत 
तपासादरम्यान जळालेले अवस्थेतील काळे रंगाचे कापड, अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे, अंडरवेअरचा जळालेला अर्धवट तुकडा आदी गोष्टी सापडल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी या गोष्टी जाळून टाकलेल्या असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं. या गुन्ह्यात यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता. त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली.
मंगळवेढय़ाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, गिरी गोसावी, अरुण सावंत आदींनी गुन्ह्याचे धागेदोरे उकलण्यात भूमिका बजावली.