‘मोदींना पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवारच होईल कोकणात खासदार’

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा तोंडावर येत आहेत. राजकीय पक्षांची आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा असलेला नमो प्रेमी उमेदवार रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी होईल, असा विश्‍वास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर, शिवसेना व नारायण राणे एनडीएबरोबर राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे दिसून आले.

चव्हाण आज चिपळूण दौऱ्यावर आले आहेत. चिपळुणमधील भाजपचे कार्यालय व विविध विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी ते या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. भाजपने मागील पाच वर्षात विकासाची कामे केली. मोदी सरकारने राबविलेल्या योजनांचा देशातील ३८ कोटी जनतेने लाभ घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.”

इतकेच नाही तर, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे पक्षसंघटना खंबीरपणे उभी राहील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील ४५ मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान शिवसेना व नारायण राणेंबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावरही त्यांनी भाष्य केले. यावर बोलताना ते म्हणाले की, “दोघेही एनडीएचे घटक पक्ष आहेत. लोकसभेत ते आमच्याबरोबर राहतील.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे दिसून आले. यावेळी ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल, नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.