नाशकातील व्यावसायिकाचा जबरी लूट करुन खून केल्याप्रकरणी दोन संशयित ताब्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – इंदिरानगर परिसरातील एका मॉलच्या व्यावसायिकाची जबरी लूट करुन सहा लाखाची रोकड पळवत हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ठार मारल्याची घटना गेल्या आठवडाभरापुर्वी घडली होती. त्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकच्या फुलेनगर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याने त्यांची नावे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

‘त्या’ वेळी नेमके काय घडले ?
व्यावसायिक अविनाश शिंदे हे नाशिकमधील इंदिरानगर येथील बापू बंगला परिसरात असलेल्या सुपर ग्राहक बाजार या मिनी सुपर मार्केटचे संचालक होते. रात्री ते दुकान बंद करुन घरी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाश शिंदे यांनी त्यांना विरोध करताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यांच्या हातात असलेली पैशांची बॅग घेऊन ते पळून गेले.

या घटनेचा तपास पुर्ण होत नाही त्यापाठजोपाठ मंगळवारी पुन्हा मकरसंक्रांतीच्या रात्री नऊवाजेच्या सुमारास भद्रकाली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका युवकाला टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करीत ठार मारल्याची घटना घडली. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या प्रकारच्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.