‘फॉक्सवॅगन’ ला हरित लवादाकडून १०० कोटींचा दणका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरित लवादाने (एनजीटी) फॉक्सवॅगनला गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १०० कोटी  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करण्याचे आदेश दिले आहेत.अन्यथा कंपनीच्या देशातील ‘एमडी’ वर अटकेची कारवाई केली जाईल आणि भारतातील कंपनीची सर्व मालमत्ता जप्त केली जाईल, असा इशारा दिला आहे. भारतात डिझेल गाड्यांमधील कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी वास्तविक आकड्यात फेरबदल करता येतील असे उपकरण वापरल्याचा कंपनीवर आरोप आहे.

चुकीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून दिल्लीतील हवा प्रदूषण वाढल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) फॉक्सवॅगन या कार निर्मिती करणाऱ्या कंपनीला जोरदार दणका दिला आहे. सलोनी अलवाडी नावाच्या एका शिक्षिकेसह काही लोकांनी पर्यावरणाचे होणारे नुकसान पाहता देशात या कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीवर बंदी घालावी अशी विनंती लवादाकडे केली होती.

एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने फॉक्सवॅगनच्या गाड्यांपासून होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना होती. या समितीमध्ये पर्यावरण मंत्रालय, अवजड उद्योग, सीपीसीबी आणि ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. एनजीटीच्या चार सदस्यीय समितीने जर्मन कार निर्माती कंपनी फॉक्सवॅगनला चुकीचे सॉफ्टवेअरचा वापर करून दिल्लीतील हवा प्रदूषण वाढविल्याप्रकरणी १७१.३४ कोटी रुपये दंड करण्याची शिफारस केली होती. त्यावर एनजीटीने कंपनीवर कारवाई केली आहे.