प्रियांका गांधी काँग्रेससाठी ‘बहार’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशावरून वक्तव्य केले आहे. “प्रियांका गांधी काँग्रेससाठी बहार म्हणून आल्या आहेत. पहिल्यांदा एकटा भाऊ (राहुल गांधी) आमच्यासाठी आधार, लढवय्या सैनिक होता. आता प्रियांका गांधीही आल्या आहेत. त्यामुळे ‘एक और एक ग्यारह, बीजेपी नौ-दो-ग्यारह’ होईल,’ अशा शब्दात सिद्धू यांनी प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशाचे स्वागत केले आहे. ते सोमवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रियांका गांधी म्हणजे इंदिरा गांधींची छबी
यावेळी बोलताना सिद्धू म्हणाले, ‘प्रियांका गांधींसाठी हा मार्ग काही सहज-सोपा नाही. या मार्गावर फुले नव्हेत, तर काटे पसरलेले आहेत. त्यांच्यावर अत्यंत कठीण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी त्या नक्की पूर्ण करतील. त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांची छबी इंदिरा गांधींची आठवण करून देते. त्या सर्वांसाठी आदर्श ठरत आहेत. त्यांच्या येण्याने काँग्रेसमध्ये सकारात्मक वातावरण आहे. कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाली असून प्रियांका यांच्या येण्याने काँग्रेसला खूप मोठा फायदा होईल,’ असे सिद्धू म्हणाले.