‘ठाकरे’ बायोपिक : नवाजुद्दीनचा व्हिडीआे लीक 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘ठाकरे’ या बायोपिकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार अाहे. नवाजुद्दीन या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून त्याचा एक व्हिडिओ नुकताच लीक झाला आहे. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असल्याचं समजत आहे. मुख्य म्हणजे लीक झालेल्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या लूकमधील नवाजची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

या व्हिडीआेतील सर्व सीन हा संपूर्ण ब्लॅक अँड वाईट अशा स्वरूपात आहे. दरम्यान या व्हिडीआेत फक्त बाळासाहेबांच्या लूकमधील नवाज आणि  भगवे असणारे झेंडे एवढंच भगव्या रंगात दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या भूमिकेसाठी नवाजने मेहनत घेतली आहे आणि ते या व्हिडिओत स्पष्ट होत असतानाही दिसत आहे.

या चित्रपटाचं  दिग्दर्शन अभिजीत पानसे करत असून  २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं समजत आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी सचिन खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

विशेष बाब अशी की, या चित्रपटाची पटकथा  संजय राऊत यांनी लिहिली आहे. ही पटकथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल  चार वर्षे लागली आहेत. या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं असल्याचं समजत आहे.  ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.