साताऱ्यात खासदारकीसाठी ‘या’ नावाची चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना आमचा विरोध आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी आग्रह केलातरी आम्ही त्यांच्याविरोधातच काम करणार नाही, असा निर्धार सातारा तालुक्‍यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी केला. सातारा तालुक्‍यातील आमदार समर्थक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

शरद पवारांनी विचार करून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासारखा उमेदवार द्यावा, त्यांना आम्ही निवडुन आणू, अशी भूमिका यावेळी या सदस्यांनी मांडली.

पक्षाचे काम करताना आम्हाला उदयनराजेंशी संघर्ष करावा लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत आम्ही संघर्ष करून निवडुन आलो आहोत. राष्ट्रवादीने पद, प्रतिष्ठा दिलेले काही उदयनराजे यांचे समर्थक भाजपमध्ये गेले आहेत. आता त्यांनाच उदयनराजे गाडीत घेऊन फिरत आहेत. यांची भुमिका उदयनराजेंनी स्पष्ट केली पाहिजे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदयनराजे आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाच्या विरोधात काम करतात ते चालते. आम्ही निवडणुकीत उदयनराजे व त्यांच्या समर्थकांना मदत करतो, पण आम्ही ज्यावेळी निवडणुकीला उभे असतो त्यावेळी उदयनराजे व त्यांचे समर्थक विरोधात काम करतात. आम्हाला त्रास देतात, असा रोषही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, सर्वजण विरोधाच्या भुमिकेवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत उदयनराजेंना मदत करणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे सातारा लोकसभेसाठी उमेदवार नाही,असं म्हणून चालणार नाही. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या खासदार मिळाला तर सातारा मतदारसंघात चांगल्या पध्दतीने कामे होतील, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली. त्यामुळे आता साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता वाढली आहे. तर त्यांच्या जागेवर श्रीनीवास पाटलांचे नाव जोर धरत आहे.