तो खुलासा गेला कुठे ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे हकालपट्टी प्रकरण

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन- पक्षातून हकालपट्टी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी खुलासा सादर केला नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवकांना बजाविलेल्या आदेशात म्हटले आहे. मात्र, आम्ही खुलासा सादर केला आहे, असा दावा पक्षातील नगरसेवकांनी यापूर्वीच केलेला आहे. त्यामुळे नगरसेवकांनी दिलेला खुलासा गेला कुठे? की त्यांनी खुलासाच दिला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी दुपारी भाजपाला पाठिंबा दिल्याप्रकरणी पक्षातील 18 नगरसेवकांची हकालपट्टी केली होती. सदर नगरसेवकांनी आ. संग्राम जगताप यांच्या आदेशावरून महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता. भाजपाला पाठिंबा देऊ नका, असा आदेश  मी  नगरच्या स्थानिक आमदारांना दिला होता, असे खुद्द शरद पवार यांनी सांगितलेले आहे. तरी तो आदेश धुडकावून लावण्यात आला होता. ही बाब पक्षाने गांभीर्याने घेऊन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व 18 नगरसेवकांना नोटीस काढून सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर खुलासा प्राप्त झाला नाही. त्यामुळे एकतर्फी कारवाई करून सर्व नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे, असा आदेश जयंत पाटील यांनी शनिवारी दुपारी सर्व नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांना दिला आहे.

आम्ही खुलासा दिला आहे, असा दावा काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांनी केला होता. तरीही मुदतीत खुलासाच दाखल झाला नाही, असे प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे खुलासा दिला की नाही, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

बडतर्फ नगरसेवक ‘आयुर्वेद’वर

महापौर निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारत पक्षातून बडतर्फ केल्यानंतर शनिवारी  सायंकाळी नगरसेवकांनी ‘आयुर्वेद’वर धाव
घेऊन आ.संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली.

पक्षाने बजावलेल्या नोटिसीवर नगरसेवकांनी एकत्रिक खुलासा प्रदेशाध्यक्षांकडे सादर केलेला असतांनाही खुलासा सादर झालेला नसल्याचे कारवाईच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांसमोर भूमिका मांडण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

जगताप पिता-पुत्रांचे काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला पाठिंबा दिलेल्या नगरसेवक व शहर जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी केलेली आहे. परंतु, त्यांना भाजपाला पाठिंबा द्यायला लावणार्या आ. संग्राम जगताप व आ. अरुण जगताप यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे तर्कविर्तकांना उधाण आले आहे.