त्यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठीच युतीची गरज : रावसाहेब दानवे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मत विभागणी टाळावी, यासाठी भाजप सुरुवातीपासूनच आग्रही आहे. मोदी सरकार २०१९ ला पुन्हा सत्तेवर येणार असल्यानेच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने आघाड्यांचे राजकारण सुरू केले आहे. काँग्रेसच्या या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठीच शिवसेना व भाजपच्या युतीची गरज आहे. युतीबाबत अद्याप एकत्रित बैठक झालेली नाही. युती न झाल्यास भाजप ठरल्याप्रमाणे यूपीए आघाडीतील मित्रपक्षांसोबत लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवेल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथनिहाय आढावा बैठकीसाठी खा. दानवे एकदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. ही बैठक संपल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, गोकुळचे संचालक बाबा देसाई आदी उपस्थित होते.

खा. दानवे म्हणाले, राज्यात शिवसेना, भाजपाची युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. युतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. शिवसेनेने केंद्रीय पातळीवर युतीची चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली असली तरी युतीची चर्चा ही आतापर्यंत राज्यस्तरावरच होत आली आहे. युतीचा निर्णय राज्यातच होईल. आतापर्यंत युतीबाबत कोणतीही बैठक झालेली नाही. ती लवकरच होईल. समविचारी पक्ष एकत्र यावेत, मत विभागणी टाळावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. काँग्रेसने आतापर्यंत आघाडीतील इतर नेत्यांना मोठे होऊ दिले नाही. या मानसिकतेमुळेच एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर पाहणे काँग्रेसला जड जात आहे. सर्व आघाड्यांवर मोदी शासन यशस्वी ठरले आहे. विकास या एकाच मुद्द्यावर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. त्यामुळेच देशात भाजपाविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येत आहेत, तरी उपयोग होणार नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदीच पुढील पंतप्रधान असतील, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

दानवे म्हणाले, मी आतापर्यंत तीन वेळा खासदार तर चार वेळा आमदार झालो आहे. निवडणुकांचा अनुभव आहे. मागील लोकसभा निवडणुकांच्या तारखा पाहता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल, असा विश्वास आहे.