क्राईम स्टोरी

वासनांध पुतण्याने चुलतीवर केला लैंगिक अत्याचार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चुलतीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पुतण्याला वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधने यांनी १० वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात ३० वर्षीय पीडितेने तक्रार दिली होती.

पीडितेचा पती उसाचे वाडे विक्री करण्यासाठी जोगेश्वरी गावात गेला. तर घरातील किराणा सामान संपल्याने पीडिता जोगेश्वरी गावात पायी निघाली. वाटेत दुचाकीवर तिला आरोपी भेटला. त्याच्या दुचाकीवर किराणा सामान घेण्यासाठी ती किराणा दुकानात गेली. परत येताना आरोपीने दुचाकी दुसऱ्या रस्त्याने घेतली. त्यावर पीडितेने शंका उपस्थित केली. पण या रस्त्याने लवकर घरी पोहचू अशी थाप आरोपीने मारली. तसेच एका शेताजवळ दुचाकी उभी केली व पीडितेल शेतात ढकलत, त्याने तिच्यावर अत्याचार केला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी आल्यावर पीडितेच्या पतीने विचारपूस केली असता, पीडितेने घडलेला प्रकार त्याला सांगितला. पीडितेच्या तक्रारीआधारे आरोपीविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणात तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तर पीडितेच्या साडीवरील डागांचा रासायनिक विश्लेषण अहवाल देखील खटल्यात महत्त्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी पुतण्याला कलम ३७६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद व कलम ५०६ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठाविली.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या