‘मॅगी’ची जबरी ऑफर, रिकामी पाकिटं द्या आणि भरलेलं पाकीट घेऊन जा… 

देहरादून : वृत्तसंस्था – झटपट तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये मॅगी नूडल्स हा पदार्थ आबालवृद्धांच्या पसंतीच्या पदार्थांच्या यादीत आहे. आता मॅगीच्या याच फॅन्स करिता नेस्ले इंडियाने ग्राहकांसाठी एक जबरी ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार मॅगीची १० रिकामी पाकिटं दुकानदाराला दिली तर तुम्हाला मॅगीचे भरलेले पाकीट मोफत मिळणार आहे. मात्र ही ऑफर सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये सुरु आहे.

लवकरच ही ऑफर इतर राज्यांमध्ये देखील सुरु करण्यात येणार आहे. असा कंपनीचा विचार आहे. देहरादून आणि मसूरीमध्ये कंपनीचे जवळपास २५० रिलेटर्स आहेत, या सर्व रिटेलर्सकडून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

का दिली आहे अशी ऑफर
प्रदूषणाचा धोका लक्षात घेत नेस्ले इंडियाने हे पाऊल उचलले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच प्लास्टिकचा कचरा कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास नेस्ले इंडियानं व्यक्त केला आहे. तसंच, व्यापाऱ्यांचाही फायदा होईल असं कंपनीने म्हटलं आहे. तर, रिकाम्या पाकिटांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ‘इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन’ची असणार आहे.

‘इमेज रीबिल्डिंग’ ची स्ट्रॅटजी ?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातच मॅगी मध्ये अळी आढळली होती. तसेच यापूर्वी देखील मॅगी मध्ये शिसे आढळल्याने मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर देखील मॅगी कंपनीकडून आम्ही निर्दोष असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा मॅगी नव्या जोमात बाजारात आली होती. त्याचा दर  देखील वाढवण्यात आला होता. आता मात्र पर्यावरण संवर्धन जागरूकता करण्यासाठी मॅगी ने ही रिकामे पाकीट देण्याची आणि नवी पाकिट घेण्याची ऑफर काढली आहे. ही ऑफर म्हणजे ‘इमेज रीबिल्डिंग’ ची नवी स्ट्रॅटजी तर नाही ना अशी शक्यात वर्तवण्यात येत आहे.