पिंपरी-चिंचवड : अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी वणवण, साहित्याची जुळवा-जुळव

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन
अमोल येलमार 

पिंपरी- चिंचवडच्या स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पोलीस आयुक्त, अतिरीक्त पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी युनिट या सगळ्यासाठी जागेची शोधा शोध सुरु आहे. तर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कार्यलायत लागणाऱ्या साहित्याची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. जागांची शोधा शोध आणि साहित्याची जुळवा जुळव करुन येत्या बुधवार पासून कामकाज सुरु करण्यासाठी सगळीकडे एकच लगबग सुरु आहे.

शासनाकडून पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास मंजुरी मिळाली आणि तशी अधिसूचना निघाली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील भोसरी, दिघी, पिंपरी, एमआयडीसी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी आणि प्रस्तावित चिखली पोलीस ठाणे तर पुणे ग्रामीण मधील देहूरोड, तळेगाव, एमआयडीसी-तळेगाव, आळंदी, चाकण यांचा समावेश करण्यात आला. पोलिस आयुक्तालयाच्या विविध कक्षासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी असे एकूण ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून २ हजार २०७ पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित २ हजार ६३३ पदे तीन टप्प्यांमध्ये भरती करण्यात येणार आहेत.
[amazon_link asins=’B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’10b15166-9eb7-11e8-9d94-8bf703a0f4b7′]

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तलयाचे प्रथम आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती झाली आहे तर मकरंद रानडे हे अतिरिक्‍त आयुक्‍त असणार आहेत. नम्रता पाटील, विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील हे उपायुक्‍त म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय सात सहायक आयुक्त, ६७ पोलिस निरीक्षक, ८६ सहायक निरीक्षक, २१५ उपनिरीक्षक, ३७३ सहायक उपनिरीक्षक, ७४५ पोलिस हवालदार, १०२२ पोलिस नाईक, २१६३ पोलिस शिपाई, १२५ अकार्यकारी दल, ३१ पोलिस दवाखान्यासाठी कर्मचारी नेमायचे आहेत.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा कारभार १५ ऑगस्ट पासून सुरु करावा यासाठी गृह विभागाने शुक्रवारी (दि.१०)  अधिसूचना काढली. स्वतंत्र आयुक्तालयाची कागदपत्रे बनविण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील पुणे शहर, पुणे ग्रामीण असा नामोल्लेख असलेले फलकदेखील बदलावे लागणार आहेत.  पोलिस ठाणी वायरलेसद्वारे जोडायला लागणारा ‘अँटेना’ छतावर बसवण्याचे  काम सुरु आहे. व्यायाम शाळेतील साहित्य स्थलांतरित करून रंगरंगोटीचे व कंट्रोल रूम साठी लागणारी मशनरी बसवण्याचे काम सुरू आहे.
प्रेमलोक पार्क येथील इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. ऑटोक्लस्टरच्या इमारतीमधील दोन कक्ष आयुक्तलयासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र सध्याच्या पोलिस उपायुक्‍तालयातूनच कामकाज करण्यात येणार आहे. त्यामुळे उपायुक्‍तालयाची डागडुजी आणि रंगरंगोटीचे काम  युद्धपातळीवर सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावर पोलीस आयुक्त, पहिल्या मजल्यावर अतिरिक्त आयुक्त, तिसऱ्या मजल्यावर एक उपायुक्त, ऑटो क्लस्टर मधील दोन कार्यालयात दोन उपायुक्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देहूरोड आणि पिंपरी सहायक आयुक्त आहे त्या कार्यालयात तर चाकण सहायक आयुक्त चाकण शहरात आणि वाकड सहायक आयुक्तांचे कार्यालय जुन्या वाकड पोलीस ठाण्यात असण्याची शक्यता आहे. याच बरोबर गुन्हे शाखांच्या वेगवेगळ्या युनिट साठी कार्यालयांची शोध मोहीम सुरु आहे.
[amazon_link asins=’B00ZR9C9Q2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75454df6-9eb7-11e8-ac00-47891a0a11e3′]

या सर्व कार्यालयात विशेषतः पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त कार्यालयात लागणारी साहित्य सामुग्रीची जुळवा जुळव सुरु आहे. वेगवेगळ्या साहित्याची जबाबदारी ठरवून दिलेली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या अगोदर ते साहित्य आणून बसण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची पळापळ सुरु आहे. याच सोबत इतरही आवश्यक वस्तू आणून कार्यालय सुरु करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत.