आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन धोरणाची आवश्यकता : सुखदेव थोरात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शैक्षणिक क्षेत्रात ज्युनियर केजीपासून ते विद्यापीठापर्यंत मोठ्या प्रमाणावर खासगीकरण होत आहे. यामुळे सरकारी शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील विद्यार्थी शिक्षणासाठी वंचित राहणार आहेत. यासाठी सरकारला धोरणे तयार करावयास भाग पाडावे लागेल, यासाठी पुन्हा अराजकीय संघटनांच्या माध्यमातून पुन्हा लढा सुरू करण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी मक्रणपूर येथे आयोजित मक्रणपूर (डांगरा) परिषद व जय भीमदिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात केले.

मराठवाड्यातील दलितांची स्थिती विदर्भ, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रापेक्षाही दयनीय असल्याचे सांगत मराठवाड्यातील दलितांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया गरिबीची व मागासलेपणाची स्थिती ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात वाईट असून ३२ टक्के दलित स्लम एरियामध्ये वास्त्यव्यास आहेत. त्यांना काहीही सोयीसुविधा मिळत नाहीत, निरक्षरांचे प्रमाण जास्तीचे, सामाजिक सुरक्षेचा अभाव, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणामुळे जीवनमान जगण्याचा स्तर घटला आहे. त्यासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी थोरात यांनी केले. येथील नर्सरीमध्ये स्वातंत्र्यसेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्या वतीने ८० वा जयभीम दिन व मक्रणपूर परिषद कार्यक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात स्मृतिस्थळाला समता सैनिकांच्या वतीने मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. फ. मुं. शिंदे, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, श्याम तांगडे, माधवराव बोर्डे, के. डी. पगारे यांना स्मृतिशेष भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रबोधन व समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रवीण मोरे यांनी स्मृतिस्थळाचे महत्त्व विषद केले. यावेळी प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, चंद्रकांत पारखे, श्याम तांगडे यांनी आपले विचार मांडले.