सवतीकडून नवजात बाळाच्या अपहरणाचा प्रयत्न 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथून नवजात बाळाला पळविण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु आईने यावेळी आरडाओरडा केल्याने सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेऊन सदर महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सीपीआरमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बाळाची आई या घटनेने खूपच घाबरल्याचे समोर आले.

धक्कादायक बाब म्हणजे या नवजात बाळाला पळवण्याचा प्रयत्न करणारी महिला तसेच बाळाची आई या दोघी सवती असून सख्ख्या बहिणी आहेत. लातूर येथील ऊसतोड मजुरांचा तांडा कोल्हापुरात ऊस तोडणीसाठी आला आहे. त्यातील या महिला आहेत.

ऊस तोडणीसाठी आलेल्या तांड्यातील महिलेला प्रसूतीसाठी बुधवारी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यरात्री तिने मुलाला जन्म दिला. तिने बाळाला जन्म दिल्याची खबर तिची सवत असणाऱ्या तिच्या सख्ख्या बहिणीला मिळाली. तिच्या सवतीच्या मनात तिच्याबद्दल मत्सर निर्माण झाला. यानंतर तिने बाळाला पळवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारी मुलाला बघण्याचा बहाणा करून ती महिला रुग्णालयात आली. यानंतर मात्र दोघींमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला. तिने त्या नवजात बाळाला स्वत:च्या ताब्यात घेत त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट तिच्या सासूलाही समजली. यानंतर दोघींनी आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून सुरक्षारक्षक तसेच इतर डाॅक्टरांनी तेथे धाव घेतली. व तिच्या सवतीकडून बाळालाही ताब्यात घेण्यात आले. यानंतर सीपीआर रुग्णालयात भीतीचे वातावरण दिसून आले.