ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार ; 3 ते 4 पोलिस जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झोन-3 मध्ये पोलिसांवर गोळीबार झाला आहे. भायखळा परिसरात नायजेरियन ड्रग्ज माफियांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला आहे. अलिकडील काळातील पोलिसांवर परदेशी नागरिकांकडून गोळीबार होण्याची किंबहुना ही पहिलीच वेळ आहे. धडाकेबाज पोलिसांनी माफियांकडून केलेल्या गोळीबारावर नियंत्रण मिळवत 7 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी चालु आहे. दरम्यान, पोलिसांनी अग्‍नीशस्त्रांसह 20 लाखाचा ऐवज जप्‍त केला आहे.

भायखळा परिसरात नायजेरियन ड्रग्ज माफिया ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला. काही पोलिस अधिकारी व कर्मचारी नायजेरियन नागरिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी काही माफियांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी देखील फायरिंग करत संपुर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी या छाप्यादरम्यान 7 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी चालु असल्याची महिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून जिवंत काडतुसे, रिव्हॉल्वर आणि ड्रग्ज असा सुमारे 20 लाखाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. गोळीबारात 3 परदेशी नागरिकांसह 3 ते 4 पोलिस जखमी झाले असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. अचानकपणे भायखळा परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली.