‘कोणतीच शक्ती देश फोडू शकत नाही’ : राहूल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. यात 44 पेक्षा जास्त जवान शहीद झाले तर, अनेक जवान गंभीर जखमी झाले. याचा देशभरातून निषेध होत असून जनतेत संतापाची लाट पसरली आहे. या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिशय कठोर शब्दात निषेध करत धिक्कार केला आहे. दहशतवादाचा हेतू हा देश फोडणे आणि या देशात दुफळी माजविणे हा आहे. मात्र, अशा बिकट स्थितीत विरोधी पक्ष, देशाची सुरक्षा दले आणि सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी शुकवारी काँग्रेस मुख्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. हा देश कोणीही फोडू शकत नाही असे सांगत त्यांनी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा दर्शवला. या पत्रकार परिषदेत हल्ल्याचा निषेध करत ते म्हणाले की, “शोक, दु:ख आणि आत्मसन्मानाची ही घडी आहे. हा हल्ला देशाच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. ज्या लोकांनी हा हल्ला केला आहे, त्यांना जराही वाटू नये की, ते आमच्यावर आघात करू शकतात. असे भ्याड हल्ले हा देश विसरत नाही, हा संदेश त्यांच्यापर्यंत जायला हवा”.

गुरुवारी (दि- 14 फेब्रवारी) काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला दहशतवादी आदिल अहमद डारने घडवून आणला होता. स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.  गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.