‘या’ स्पर्धेसाठी पाकिस्तानी खेळाडू भारतात ; सरकारची परवानगी 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्याचा पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या, पाकिस्तानशी सर्व संबंध तोडा, याचबरोबर भारताने आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत असतांनाच केंद्रीय गृह खात्याने नवी दिल्ली येथे होणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना विसा देण्यास परवानगी दिली आहे.

गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. इतकेच नव्हे तर, देशात विविध ठिकाणी निषेध म्हणून पाकिस्तानचे प्रतिकात्मक पुतळे, झेंडे जाळून टाकण्यात येत आहे. याचबरोबर या दहशतवादी हल्याचा पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या, पाकिस्तानशी सर्व संबंध तोडा, याचबरोबर भारताने आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. मात्र केंद्रीय गृह खात्याने पुढच्या महिन्यात नवी दिल्ली येथे होणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना विसा देण्यास परवानगी दिली आहे. असे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव राजीव भाटिया यांनी म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, केंद्रीय गृह खात्याने नवी दिल्ली येथे होणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी येणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंचा विसा मंजूर केला असून तो उच्चायुक्तांकडे व इस्लामाबाद येथे सुपूर्द करण्यात आला आहे. असेही असे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सचिव राजीव भाटिया यांनी म्हंटले. विशेष म्हणजे, गृह मंत्रालयाने पाकिस्तानी खेळाडूंचा विसा नाकारण्यात येणार नाही असा विश्वासही दिला आहे.

विशेष म्हणजे, येत्या शुक्रवारी पाकिस्तानचे एक प्रशिक्षक तसेच दोन खेळाडू भारतात येण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली येथे २० ते २८  फेब्रुवारी या कालावधीत ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.