सेन्सॉरची कात्रीही बाळासाहेब ठाकरेंसमोर लहान : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सेन्सॉरची कात्रीही बाळासाहेबांसमोर लहान असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सेन्सॉरचा होता आक्षेप

चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी यातील काही दृश्य आणि संवांदावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता. त्यामुळे, सीबीएफसीकडून चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी असे उत्तर दिले. यासोबतच तुम्हाला कोणी सांगितलं की सीबीएफसीला चित्रपटावर आक्षेप आहे? असा सवालही त्यांनी केला. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सीबीएफसीकडून प्रमाणपत्रदेखील मिळालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

चित्रपटात प्रत्येक ती गोष्ट आहे जे पाहण्याची प्रेक्षकांना इच्छा आहे. सेन्सॉरची कात्रीदेखील बाळासाहेबांसमोर लहान आहे. ते स्वतःच दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवत, असेही राऊत यावेळी म्हणाले. ‘ठाकरे’ चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.

आया रे सबका ‘बाप’ रे… ‘ठाकरे’ ; सिनेमातील पाहिलं गाणं लाँच.

अतिशय वादग्रस्त संवादांमुळं चर्चेत असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘ठाकरे’ चित्रपटातील पहिलं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं. ‘आया रे आया सबका बापरे… कहते उसको ठाकरे’ असे या गाण्याचे बोल असून काही मिनिटांतच यूट्यूबवर या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलात हा सोहळा पार पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत, चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव हे यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य करणारं हे गाणं असून ते नकाश अजीज यांनी गायलं आहे. संगीत रोहन रोहन यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे’ चित्रपटातील संगीताचं यावेळी कौतुक केलं. ‘हे गाणं मलाही खूप आवडलं आहे. मला जेव्हा हे पहिल्यांदा ऐकवलं गेलं, तेव्हा मला ठेका धरावासा वाटत होता, पण मला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.