नंबर प्लेटवर जात टाकताय ? सावधान…. !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गाड्याच्या नंबरप्लेटवर अनेकांना काहीना काही लिहिण्याची सवय असते हे आपण खूपदा पाहिले असेल. इतकंच काय तर चक्क गाडीच्या नंबरचंही चक्क नावात रुपांतर केलं जातं. यासाठी अनेक वेगवेगळे फाँटही वापरले जातात. धक्कादायक म्हणजे काही ट्राफिक नियमही आहेत याबाबत आणि अशा  ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन करून गाड्यांच्या नंबर प्लेटवर काही ना काही लिहिलं जात. काही नंबरचं रुपांतर नावात तर काही त्यांच्याच आडनावात करतात. काही लोकं तर चक्क गाड्यांच्या नंबर प्लेटवर जात लिहायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आणि म्हणूनच आता अशांविरूद्ध नोएडा पोलिसांनी याविरुद्ध एक अभियान सुरु केलं आहे. ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन करून गाड्यांच्या नंबर प्लेटवर जात लिहिणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो आहे.
दिल्ली एनसीआर सह देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गाड्यांच्या नंबर प्लेटवर जाती मोठमोठ्या अक्षरांमध्ये लिहिल्या जातात. वाहतूक नियमांविरुद्ध या नंबर प्लेट लावल्या जातात म्हणून नोएडामध्ये या अभियानाला सुरुवात झाली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राहुल श्रीवास्तव यांनी या अभियानाबद्दल एक ट्विट केलं आहे. ‘जात पे न पात पे, चालान मिलेगा हात पे…’ असं ट्विट राहुल श्रीवास्तव यांनी केलं आहे. दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये अशी अनेक वाहनं आहेत ज्यांच्या नंबर प्लेटवर जाट, पंडित, गुर्जर, जाटव अशी जातींची नावं लिहिण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे राहुल श्रीवास्तव यांच्या या मोहिमेचं ट्विटरवरून अनेकांनी स्वागत केलं आहे. तसंच फक्त नंबर प्लेटवरच नाही तर गाड्यांच्या काचांवर मागच्या बाजूलाही जात लिहिली जाते. अशांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही ट्विटर युजर्सनी केली आहे.