हेल्मेट सक्तीचा दणका पोलिसांनाही, अनेकांना पाठविल्या नोटीसा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी हेल्मेट गरजेचे आहे. प्रशासनाकडून हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र हेल्मेट सांभाळणे, दुचाकीवरून उतरल्यानंतर ठेवण्याची अडचण वाटत असल्याने हेल्मेटला विरोध केला जात आहे. हेल्मेटचे प्रबोधन करण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पोलिसांना हेल्मेट सक्ती केली आहे. गेल्या महिनाभरात ज्या पोलिसांनी हेल्मेटचा वापर केला नाही, त्यांना नोटीस पाठवल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात सुनावले आहे.

दुचाकीवरून प्रवास करताना चालक व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती आहे. शहरातून फिरताना हेल्मेट वापरणे, ते काढून ठेवणे अडचणीचे वाटते. शहर असो अथवा महामार्ग अपघात कोठेही घडू शकतात. त्यामुळे हेल्मेट वापरण्याची सक्ती सर्वच ठिकाणी आहे. शहरात फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना काही प्रमाणात सवलत दिली आहे; मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वारास हेल्मेट सक्ती आहे.

कोल्हापूर पोलिसांनी हेल्मेट सक्तीला स्वत:पासून सुरुवात करत प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ३१ पोलीस ठाण्यात तीन हजार पोलीस दल आहे. यापैकी सर्वांकडे हेल्मेट गरजेचे केले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना प्रत्येक पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्याने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. डिसेंबर महिन्यात हा आदेश काढला आहे. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस नेहमी रस्त्यावर असतात, त्यामुळे त्यांना तर शासनातर्फे मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.