आता जनतेने सत्ताधाऱ्यांचे सर्जिकल स्ट्राइक करावे : अशोक चव्हाण

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गोरगरीब जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न या सरकारने सोडविले नसून आता जनतेने सत्ताधाऱ्यांचे सर्जिकल स्ट्राइक करावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्यात येथील अभिनव लॉनमधील आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करीत होते.

यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित येऊन एकतेचे प्रदर्शन घडविल्याबद्दल आनंद व्यक्त करून मागील कॉंग्रेसच्या कार्यकाळात जिल्हा प्रगतीच्या मार्गावर होता, याची आठवण करून दिली. राज्यात आदिवासी भागात आरोग्य व कुपोषणाचा प्रश्न बिकट असून कुपोषणामुळे लहान मुलांचा मृत्यू होत असताना सत्तेने उन्मत्त झालेले सत्ताधारी मात्र, बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत, असा आरोप केला. कॉंंग्रेसच्या काळात आदिवासींना पट्टे दिलेल्या वनजमिनी उद्योगपतींच्या घशात घालून आदिवासी व गरिबांना उपेक्षित ठेवण्याचे काम भाजपानेे केले.

विदर्भात दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू जोरात असून वाळूची तस्करी करून सत्ताधारी आपला विकास साधत आहेत. सिंचन प्रकल्प अपूर्ण असून पूर्णपणे कर्जमाफी झालेली नाही. नुकतेच कॉंग्रेसचे सरकार आलेल्या बाजूच्या तीन राज्यांत धानाला २५०० रुपये आधारभूत किंमत आहे. मात्र, महाराष्ट्रात केवळ १७०० रुपये भाव दिला जात आहे. त्यामुळे धानाला ८०० रुपयाचे अनुदान दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात लेखक, साहित्यिक व पत्रकार यांच्या लिखाणावर व भाषणावर बंदी घालून सरकारने आवाज दाबण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सांगून आता सरकार बदलविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संदेश जनतेला दिला.