आता चक्क वाहतुक नियमनासाठी रोबोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वाहतुकीच्या समस्येवर मात करण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. सिग्नल, सीसीटीव्ही यंत्रणेच्या पुढे जाउन वाहतुक पोलिसांनी आता चक्क वाहतुक नियमनासाठी रोबोटची मदत घेण्याची शक्कल लढविली आहे. पुण्यातील एसपी रोबोटिक्स मेकर लॅबने तयार केलेल्या रोबोटच्या सहाय्याने पादचारी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितरित्या रस्ता ओलंडण्यासाठी मदत केली जाणार आहे. १५ जानेवारीला पोलिस आयुक्तालयामध्ये या रोबोटची चाचणी घेतली जाणार असल्याचे वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी कळविले आहे.

वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांच्या अलोट गर्दीमुळे शहरात वाहतुक कोंडी आणि त्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यातही अपघातातील मनुष्यहानी रोखण्यासाठी वाहतुक पोलिसांच्यावतीने सातत्याने विविध उपाययोजना आणि विशेष योजना राबविण्यात येत आहेत. या योजना राबविताना चार चाकी वाहन चालक, जड वाहतुक, सायकलस्वार आणि विशेष असे की सर्वाधीक संख्या असलेल्या दुचाकीस्वारांसाठी कडकातील कडक नियमावलींची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापुढे जावून पादचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा पादचार्‍यांचे अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित रोबोटचा प्रयोग करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

पुण्यातीलच एसपी रोबोटिक्स मेकर लॅबने पादचारी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना सुरक्षितरित्या रस्ता ओलांडण्यासाठी रोबोट तयार केला आहे. या रोबोटची चाचणी संक्रातीला अर्थात १५ जानेवारीला दुपारी तीन वाजता वाहतुक शाखेच्या येरवडा येथील कार्यालयात घेतली जाणार आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ही चाचणी यशस्वी झाल्यास या रोबोटचा भविष्यात वाहतुक नियमनासाठी उपयोग केला जाईल, असेही सातपुते यांनी कळविले आहे.