नर्सचे आणि रुग्णाचे जुळले प्रेमसंबंध, पुढे झाले असे काही…

म्हैसूर : वृत्तसंस्था – अनेकदा प्रेमात पडल्यानंतर प्रेमी सोबत राहण्याच्या आणा-भाका घेतात. लग्न करण्याचे वचन एकमेकांना देतात. परंतु काही वेळा वचन पाळले जात नाही आणि याचाच त्या प्रियकराला किंवा प्रेयसीला चांगलीच किंमत मोजावी लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने दिलेले लग्नाचे आश्वासन मोडल्यानंतर  एका नर्सने प्रियकरावर बलात्काराचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून चक्क रुग्णालयात दाखल एक रुग्णच आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचे नर्सबरोबर प्रेमसंबंध जुळले. पीडित तरुणी त्या रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. दोघेही कर्नाटकातील गुंडलूपेठ येथे रहायला असून दोघांची जातही समान आहे. महादेवा प्रसाद (२५) असे या आरोपी रुग्णाचे नाव आहे. सध्या हा आरोपी फरार असल्याचे समजते आहे. तीन वर्षांपूर्वी महादेवा प्रसाद म्हैसूर येथील एका रुग्णालयात दाखल होता.

आरोपी महादेवा प्रसादला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तो नर्सच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे आरोपी बंगळुरुत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो.  डिस्चार्ज मिळाल्यानंतर नर्सच्या संपर्कात असणाऱ्या महादेवा प्रसादने वर्षभरानंतर तिला बंगळुरुतील एका मोठया हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी मदतही केली होती. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवले. परंतु काही महिन्यांपूर्वी नर्सने लग्नाचा विषय छेडण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

त्याने टाळाटाळ सुरु केल्यानंतर नर्सला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. जेव्हा महादेवा प्रसादने लग्नाची तिची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली तेव्हा संबंधित नर्सने त्याच्याविरोधात कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे दोघेही एकाच जिल्ह्यातले, एकाच जातीचे असल्याने लग्नात फारशा अडथळयाची शक्यता नव्हती तरीही महादेवा लग्नासाठी टाळाटाळ करत होता.