नियंत्रण कक्षात फोन करून महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील संभाषण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील संभाषण करत त्यांचा विनयभंग केल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. याप्रकऱणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वीही ऑक्टोबर महिन्यात असे प्रकार समोर आले होते. त्यासोबतच खडक पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यासोबत असाच प्रकार घडला होता.

याप्रकऱणी दोन महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २९ जानेवारी व २ फेब्रुवारी रोजी हे प्रकार घ़डले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पुणे पोलीस नियंत्रण कक्षात कॉल टेकर म्हणून काम करत होत्या. त्यावेळी २९ जानेवारी रोजी १०० क्रमांकावर एका व्यक्तीने फोन केला. त्यावेळी फिर्यादी यांच्याशी त्याने अश्लील भाषेत संभाषण करत विनयभंग केला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. तर दुसरी घटना २ फेब्रुवारी रोजी घङली आहे.

यापुर्वी ऑक्टोबरमध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर खड़क पोलीस ठाण्यात फोन करून एका माथेफिरूने महिला पोलीस कर्मचाऱ्याशी अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केला होता. त्याला अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी नियंत्रण कक्षात येणारे अनावश्यक कॉल कमी करण्यासाठी आयव्हीआरएसची यंत्रणा कार्यान्वित केली होती.