१० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या परिरक्षण भूमापकावर गुन्हा

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – मालमत्ता नावावर करून देण्यात मदत केली म्हणून १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या परिरक्षण भूमापकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भूमिअभिलेख कार्य़ालयात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली आहे.

किरण माधवराव काकडे (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या परिरक्षण भूमापकाचे नाव आहे. याप्रकरणी वाशीम येथील ३१ वर्षाय व्यक्तीने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

किरण काकडे हा वाशिम उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय येथे परिक्षण भूमापक म्हणून कार्य़रत आहेत. तक्रारदार यांच्या आजोबांची मालमत्ता तक्रारदार यांचे वडील आणि काकाच्या नावावर करण्यासाठी किरण काकडे याने मदत केली होती. या बदल्यात काकडे याने तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार १६ ऑक्टोबर २०१८ रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने २२ ऑक्टोबर रोजी याची पंचासमक्ष पडताळणी केली. पडताळणीमध्ये काकडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, काकडे याला संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. काकडे याच्यावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार दामोदर, खान निशा, चालक खडसे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.