सेनापती बापट रस्त्यावर या कंपनीत झाली सव्वा लाखाची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचा काढून सेनापती बापट रस्त्यावरील ताक्षी अटोकंपोनंट कंपनीच्या कार्यालयातून चोरट्यांनी १ लाख २५ हजारांची रोकड लंपास केली. तर शेजारच्या कार्यालतही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकिस आला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन सातप्पा पोवार (३४, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील प्राईड कुमार सिनेट इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर ताक्षी अटोकंपोनंट प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते शुक्रवारी सकाळी नऊपर्यंत कंपनीचे कार्यालय बंद होते. त्यावेळी कोणीतरी चोरट्यांनी कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीचे काच फोडून आत प्रवेश केला आणि टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेली १ लाख २५ हजार रुपये किंमतीची रोकड लंपास केली. त्यासोबतच त्यांच्या कार्यालयाशेजारील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या काचा काढून आत प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार समोर आल्यानंतर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.