संतापाच्या भरात ‘त्याने’ पोलीस ठाण्यात प्राशन केले विषारी द्रव्य, पोलीसांची उडाली धावपळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आलेल्या शहरातील एका व्यक्तीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विष प्राशन करणारा व्यक्तीचे नाव मो.फारूक मो.अब्दुल समद असे असून यावल शहरातील रहिवासी आहे. मो.फारुख यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.या प्रकाराने यावल पोलीस स्टेशन व तहसील आवारात सकाळपासूनच गर्दी होती.

याबाबत माहिती अशी की, शहरातील रहिवासी मो.फारूक मो.अब्दुल समद यांचा शहरातील रहिवासी सय्यद अशपाक सय्यद निसार यांच्याशी पैशाच्या देवाण घेवाण वरून वाद झाला. सकाळी शहरातील चौकाजवळ हा वाद सुरू असताना फारूक यांनी यावल पोलीस स्टेशन गाठले. १०.३० वाजता पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार संजीव चौधरी हे त्यांची तक्रार लिहून घेत होते. या दरम्यानच त्यांना संताप अनावर झाला व त्यांनी त्यांच्या जवळील असलेली एका विषारी द्रव्याची बाटली काढून विषारी द्रव्य प्राशन करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, काही जणांनी त्या ठिकाणी त्यांच्या हातातील बाटली हिसकावली या ओढा-ताणमध्ये थेट पोलीस ठाण्यातच विषारी द्रव्य फेकले गेले. पोलिसांनी फारुक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार दाखल करण्यात आले. डॉ. परवीन तडवी, सरला परदेशी, डॉ. उमेश कवडीवाले यांनी प्रथमोपचार केले. फारुक यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार्थ हलविण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर आदिंनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नंबर ५/१९ भादंवि कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.के परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोरख पाटील हे करीत आहेत.