सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरुन तरुणाला सात जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करुन कोयत्याने वार केल्याची घटना २८ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री साडेबाराच्या सुमरास घोरपडी येथील पीएमटी कॉलनीजवळ घडली होती. याप्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली असून ते येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर त्यांच्या एक साथिदार जामीनावर आहे. या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.

टोळी प्रमुख श्रीनाथ उर्फ टिक्या अशोक शेलार (वय-२२ रा. घोरपडे पेठ, पुणे), कुणाल सुरेश जाधव (वय-२२ रा. कैकाडी आळी, पुणे), विपुल बबनराव इंगवले (वय-२४ रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ पुणे), प्रमोद सखाराम शेलार (वय-५० रा. झगडे आळी, घोरपडे पेठ, पुणे), राहुल श्याम भरगुडे (वय-२२ रा. एल्बो सोसायटी, शुक्रवार पेठ, पुणे), अक्षय संजीव जाधव (वय-२३ रा. काकाडे आळी, घोरपडे पेठ, पुणे), अनिकेत पांडुरंग नवगिरे (वय-२२ रा. पीएससी कॉलनी, पुणे) असे मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धिविनायक राजेंद्र हिंगे (वय-१९ रा. स्वारगेट पोलीस वसाहत, पुणे) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती.
हिंगे याची बहीण क्लाससाठी जात असताना  श्रीनाथ शेलार, कुणाल जाधव व विपुल इंगवले यांनी तिची छेड काढली होती. हा प्रकार सिद्धिविनायकला सांगितला.

त्याने तिघांची भेट घेवून पुन्हा असे करुन नका असे समजावून सांगितले होते. याचा राग मनात धरुन आरोपींनी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हिंगे घरी जात असताना त्याच्यावर हल्ला केला. हिंगे याला बेदममारहाण करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरडा ओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्तळावरुन पळून गेले. हिंगे याने पोलीसठाण्यात फिर्य़ाद दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीपैकी प्रमोद सखाराम शेलार  याला अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे.

आरोपींवर पुणे शहरात जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खंडणी मागण, खुनाचा कट, मारामारी, गंभीर दुखापत, अपहरण, लहान मुलींची छेड काढणे तसेच वैयक्तीक आणि संघटीत गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात आहे. टोळी प्रमुख श्रीनाथ शेलार, राहुल भरगुडे व विपुल इंगवले या तीन आरोपी सध्या तडीपार असून कुणाल जाधव याच्या तडीपारीचा आदेश मंजुर करण्यात आला आहे. परंतु हे आरोपी येरवडा कारागृहात असल्याने त्याची बजावणी करण्यात आलेली नाही.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रीय असणाऱ्या टोळींवर कारवाई करण्यात येत आहे. २०१८ मध्य पुण्यातील ३ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सर्वेलन्स पथकातील पोलीस उप निरीक्षक राकेश सरडे, पोलीस नाईक महेश बारवकर, महेश कांबळे, दिपक मोघे यांनी या टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी अपर पोलीस आयुक्त प्रश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन करुन ३ जानेवारी रोजी या टोळी विरुद्ध मोक्का कारवाई करण्यास मंजुरी दिली.