म. प्रदेश, छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजप सरकार, एबीपी न्यूजचा सर्व्हे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – लवकरच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगना आणि मिझोराम येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थानात भाजपाला ८४ जागा तर काँग्रेसला ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिनही भाजपा शासित राज्यांमधील लोकांचा कल महत्वाचा ठरणार आहे. एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार निवडणूक पूर्व अंदाज वर्तवण्यात आले असून मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजपा; राजस्थानात काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे.

एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार, मध्य प्रदेशातील एकूण २३० जागांपैकी भाजपाला ११६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला १०६ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजपाला येथे ४१ टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला ४० टक्के आणि अन्य पक्षांना १९ टक्के जागा मिळू शकतात. भाजपा येथे चौथ्यांदा सरकार स्थापन करु शकते. काँग्रेसला येथे चांगला प्रतिसाद असला तरी सरकार स्थापनेची संधी मिळेल, असे वाटत नसल्याचे हा सर्वे सांगतो.
तसेच छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यांपैकी भाजपाला ५१, काँग्रेसला २५ तर इतर पक्षांना ९ जागांवर समाधान मानावे लागू शकते. येथे भाजपाला ४३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ३६ टक्के आणि अन्य पक्षांना २१ टक्के मतं मिळू शकतात. राजस्थानात मतदानाच्या टक्केवारीनुसार विचार केल्यास भाजपाला ४१ टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसच्या खात्यात ४५ टक्के तर अन्य पक्षांना १४ टक्के मतं मिळू शकतात. जागांचा विचार केल्यास राजस्थानात भाजपाला ८४ जागा, काँग्रेसला ११० जागा आणि इतर पक्षांना ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये कोणाचे सरकार येईल याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. कारण येथे सध्या भाजपाचे सरकार आहे. आजवर झालेल्या अनेक सर्वेक्षणातून राजस्थानात भाजपाची स्थिती वाईट असल्याचे बोलले जात आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.