जरा हटके

लग्नात ऑर्डर केला केक ; आणि आला थर्माकोल

केटरींगवर खर्च केलेले पाच लाख गेले पाण्यात

वृत्तसंस्था : आपला लग्नसोहळा अविस्मरणीय ठरावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी वधूवरांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात येतात. असाच लग्नसोहळा साजरा करण्यासाठी फिलिपिन्समधील एका जोडप्याने केक मागवला होता. हा केक एक दोन नाही तर तब्बल पाच लाखांचा होता. जोडप्याने अतिशय आनंदाने हा केक कापला आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण केक तयार करणाऱ्याने त्यामध्ये चक्क थर्माकोल भरला होता.

वेडींग प्लॅनरने मागवलेल्या या केकमध्ये अशाप्रकारे थर्माकोल असल्याने जोडप्यावर अक्षरश: रडण्याची वेळ आली होती. वेडिंग प्लॅनरला नियोजनाचे काम दिल्यावर साधारणपणे लोक निर्धास्त असतात. पण याठिकाणी मात्र उलटेच झाले. प्लॅनरने केटरींगची योग्य ती सोय न केल्याने हे जोडपे आणि त्यांचे कुटुंबिय ऐन लग्नात हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.

रिसेप्शनच्या वेळी जेवणाचीही योग्य ती सोय न केल्याने ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांना न्यूडल्स देण्याचा पर्याय या जोडप्याने निवडला. शाईन तामायो आणि जोन शेन असे या दोघांचे नाव होते. पण अचानक अशाप्रकारची नामुष्की ओढवल्याने सर्वांसमोर मान खाली घालण्याची वेळ त्यांच्यावर आली.

लग्नात पाठवणी करताना वधू आपल्या लोकांना सोडून जायचे असल्याने खूप रडते पण याठिकाणी मात्र हा थर्माकोलचा केक पाहून ही वधू जोरजोरात रडायला लागली. आपला सर्वांसमोर झालेला अपमान तिला अजिबात सहन झाला नाही आणि त्यामुळे तिला रडू आवरले नाही. अखेर या दोन्ही कुटुंबियांना पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. मग पोलिसांनीही वेडिंग प्लॅनरच्या मुसक्या आवळल्या. पण या सगळ्यामुळे जोडप्याच्या झालेल्या मनस्तापाची किंमत मोजता येणार नाही.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या