कोंढव्यात आज मिनी मॅरेथॉनचे आयोजन

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात रविवारी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पेर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत ‘आपला कोंढवा स्वच्छ कोंढवा’ हा संदेश सर्वत्र पोहचविण्याच्या उद्देशाने या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात १, २ व ३ किलोमीटरसाठी महिला व पुरुषांसाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहे. याशिवाय १४ वर्षाच्या आतील व १४ वर्षाच्या पुढील मुली व मुलांच्या गटांना विशेष पारितोषिके देण्यात येणार असल्याचे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी सांगितले.

याबाबत हाजी गफूर यांनी सांगितले की, कोंढवा परिसरात स्मार्ट सिटी योजनेत आरोग्यपूर्ण आणि अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी गेल्या वर्षभरापासून आम्ही प्रयत्नरत आहोत़ महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. चांगल्या आरोग्याची लोकांना सवय व्हावी, यासाठी विविध कार्यक्रमाद्वारे आपला कोंढवा, स्वच्छ कोंढवा हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मॅरेथॉनचे उद्घाटन होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण, नगरसेविका परविन हाजी फिरोज, हमीदा अनिस सुंडके, हाजी फिरोज शेख, मा.नगरसेवक राईस सुंडके, मा. स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष हसीना इनामदार, राष्ट्रवादी कार्यकर्ते जफर खान आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोंढवा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी फिरोज यांनी सांगितले की, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आरक्षण मिळाले. कोंढव्यातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये चारही जागेवर त्यांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले. त्यातील तीन जागा आम्ही निवडून आणू शकलो. त्यांच्या प्रेरणेने आम्ही आजवर महिलांच्या प्रगतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.