बेळगावहून विक्रीकरता आणलेले दुर्मिळ प्रजातीचे पॅगोलिन ( खवले मांजर ) पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुर्मिळ पॅगोलीन प्रजातीचे खवले मांजर विक्रीसाठी बेळगाव येथून घेऊन आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे पॅगोलिन मांजर जप्त करण्यात आले आहे. विनायक सुरेश पाऊसकर (२७, रा. बेळगुदी ता. जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांचे तपास पथक शुक्रवारी दुपारी गस्त घालत असताना गुप्त बातमीदारा मार्फत पोलिस शिपाई अभिजीत रत्नपारखी यांना माहिती मिळाली की, दोन तिन जण कात्रज परिसरात दुर्मिळ वन्यजीव खवले मांजर घेऊन विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कात्रज दुध डेअरी चौकात पाठीवर काळी सॅक घेऊन येणारा एकाला हटकले तेव्हा तो पळून जाऊ लागला. त्यानंतर त्याला ताब्यात घेत सॅकमध्ये काय आहे अशी विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पंचांसमोर त्याची झडती घेतल्यावर बॅगेत खवले मांजर आढळून आले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याची किंमत प्रतिकिलो दीड लाख रुपये असून विक्री करण्यासाठी एसटी बसने तो बेळगाव येथून पुण्यात आला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे वजन केल्यावर ते ४ किलो ५६० ग्रॅम असल्याचे निदर्शनास आळे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. या खवले मांजराची किंमत ६ लाख ८४ हजार रुपये आहे.