#PulwamaTerrorAttacks : पाकिस्तान पंतप्रधानाची भारताला उघड धमकी 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – १४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यातुन पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हात झटकले आहेत. या हल्याचा आणि पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. जर भारताने युद्ध केले तर पाकिस्तानही प्रतिउत्तर देण्यास तयार आहे. अशी उघड धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिली.
गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी होत आहे. याचदरम्यान पाकिस्तानमधील द नेशन या वृत्तपत्राने दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हटले आहे. मात्र आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दहशतवादी हल्याचा पाकिस्तानचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. कोणत्या पुराव्यांवर भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले ?  दहशतवादी हल्ला करून पाकिस्तानला काय मिळणार आहे ? असे म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यातुन  हात झटकले आहेत.
इतकेच नव्हे तर, ”काश्मीरमधील तरुण हे मरण्यासाठी का तयार होत आहेत. आत्मघाती हल्लेखोर का बनत आहेत, याचा विचार भारताने केला पाहिजे. तसेच कुठलाही प्रश्न हा चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतो. अफगाणिस्तानमध्ये १७ वर्षांच्या लढाईनंतर चर्चेस सुरुवात झाली आहे. भारताने दहशतवादावर संवाद साधावा. जर भारताने युद्ध केले तर पाकिस्तानही प्रतिउत्तर देण्यास तयार आहे. अशी उघड धमकीही त्यांनी दिली.