पंढरीत दाटला भक्तीचा महापूर ; कार्तिकी यात्रेस जमले लाखो वैष्णव 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कार्तिक एकादशी निमित्त आज सोमवारी लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीत दाखल झाला असून पददर्शनाची रांग सातव्या शेड जवळ जाऊन पोहचली आहे. पंढरीत काल दशमी पासूनच भाविक येण्यास सुरुवात झाली होती. आज सकाळी सुमारे सात लाख वारकरी कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत दाखल झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कार्तिक एकादशी निमित्त शासकीय महापूजा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रात्री २ वाजून ४० मिनिटांनी पार पडली तर त्याठिकाणी विठ्ठलाला मराठा आरक्षण न्यायालयात  टिकू दे असे साकडे पाटील यांच्या वतीने घालण्यात आले आहे. दर वर्षी कार्तिकी यात्रे निमित्त भक्तांची मांदीआळी पांढरी मध्ये दाखल होते. कार्तिकी यात्रे निमित्त भरणारा गुरांचा बाजार हे यात्रेचे महत्वाचे वैशिष्ठ असते. या गुरांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे पंढरपूर बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.

मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले त्यांनी काल (रविवारी)  सांयकाळी वारकरी मंडळींची भेट घेऊन त्यांच्याशी  समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सोयीसुविधाच्या संदर्भांत माहिती दिली गेली.  चंद्रभागेला उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे चंद्रभागेत अंघोळ करण्यासाठी वैष्णवांनी आज सकाळी मोठी गर्दी केली होती. तसेच चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांना राहुट्या उभारण्याची परवानगी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असून वारकऱ्यांनी वाळवंटात तंबू टाकल्याने पंढरीत यात्रा साजरी दिसू लागली आहे. चंद्रभागा तीरावर कीर्तन प्रवचनाचा आणि हरीनामाचा चांगलाच जयघोष रंगणार आहे. पोलिसांच्या वतीने यात्रे निमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच नगरपालिकेच्या वतीने  सर्व शहरात सी सी टि व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.