धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समोरासमोर, हसतमुखाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

परळी : पोलीसनामा आॅनलाईन – दिवाळी हा आनंदाचा सण आहे. यावेळी सर्वजण वावदविवाद विसरुन एकमेकांना आनंदाने शुभेच्छा देतात. पळीतील व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्यान मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

लक्ष्मीपूजनासाठी परळीतील सर्व व्यापारी पेठा फुलल्या होत्या. यावेळी व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे परीळीतील मोंढ्यात आल्या होत्या. त्याचवेळी धनंजय मुंडे देखील शुभेच्छा देण्यासाठी तेथे आले होते. दोघेही आपल्या समर्थकांसह सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा देत फिरत होते. त्यावेळी सुरेश मुंडे यांच्या आडत दुकानात दोघा बहिण – भावांची अचानक भेट झाली.

यावेळी दोघेही अचानक समोरासमोर आले. त्यामुळे कार्यकर्तेही बुचकाळ्यात पडले, मात्र या भावंडांनी एकमेकांकडे हसतमुखाने पाहून एकमेकांना हस्तांदोलन करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला. नंतर “हॅप्पी दिवाळी” असे शब्द दोघांच्याही तोंडून एकदाच निघाले. त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांच्याशी साधून त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या बहिण – भावाच्या भेटीनंतर दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या तसेच प्रत्यक्षदर्शींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.