पानसरे, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गींच्या हत्येचा ‘तो’च प्लॅनर

कोल्हापूर : पोलीसनामा – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपासासाठी कर्नाटक एसआयटीकडून ताब्यात घेतलेल्या अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीतील ३५ मुद्द्यांवरून पोलीस चौकशी करत आहेत. चार वर्षांपूर्वी काळे हा कोल्हापुरात वास्तव्यास होता. पानसरेंच्या निवासस्थान परिसराची त्याने अनेक वेळा रेकी केली होती. तसेच पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश आणि एम. एम. कलबुर्गी या चारही विचारवंतांच्या हत्यांचे प्लॅनिंग त्याने केल्याचे तपासातून स्पष्ट होत असल्याचे सुत्रांकडून समजले.

कोल्हापूर एसआयटीचे पथक सात दिवस पोलीस कोठडी मिळालेल्या अमोल काळेकडे तपास करत आहेत. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद आहे. ज्या ठिकाणी काळेला ठेवण्यात आले आहे तेथे तीन शिफ्टमध्ये २५ पोलिसांचा खडा पहारा ठेवला आहे. तपास अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही जाण्यास परवानगी नाही. पानसरे, अंनिसचे डॉ. दाभोलकर, कर्नाटकच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश, माजी प्राचार्य व ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी या चारही हत्यांमागे डॉ. तावडे व अमोल काळे याचा हात असल्याचे तपासातून निष्पन्न होत आहे.
विशिष्ट संघटनेच्या लोकांनी या चारही हत्या केल्याचे आजपर्यंत तपासात पुढे आले आहे. चारही खुनांचा मास्टर माईंड डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आहे. त्याच्या बरोबरीने अमोल काळे हा प्लॅनर म्हणून काम करत होता. तावडे यांनी सांगितलेल्या मुद्द्यांप्रमाणे नेमलेल्या लोकांकडून तो काम करून घेत होता. त्यासाठी यंत्रसामग्री, तसेच योग्य व्यक्तीची निवड करण्याची जबाबदारी अमोलने पार पाडली आहे. अमोल काळे यास कोल्हापुरातील प्रतिभानगर येथे घटनास्थळी फिरवण्यात येणार होते; मात्र शहरात गर्दी असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे त्याला घटनास्थळी आणले नाही. मात्र येत्या दोन दिवसांत अमोल ज्या-ज्या ठिकाणी गेला, ज्या ठिकाणी राहण्यास होता, तेथे त्याला नेऊन पोलीस तपास करणार आहेत.