पानसरे हत्याप्रकरण : कुरणे, सूर्यवंशीला घटनास्थळी नेणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पिस्तूल व दुचाकीची व्यवस्था केल्याच्या संशयावरून वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणे यांना कोल्हापूर एसआयटीने अटक केली आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र दोन पथके नेमली आहेत. दोन दिवसांत त्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी फिरवले जाणार असल्याचे सुत्रांकडून समजले. मात्र, या तपासाबाबत पोलीस अत्यंत गोपनीयता पाळत आहेत.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात एसआयटी पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. महाद्वार रोड, बेळगाव) यास, तर नालासोपारा स्फोटक प्रकरणातील वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. करकी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडे कसून चौकशी सुरू आहे. संशयित सूर्यवंशी याने बेळगावहून दुचाकी आणून ती तावडे हॉटेल परिसरात वीरेंद्र तावडेच्या ताब्यात दिल्याचे समजते. त्यानुसार चौकशी केली जात आहे, तर कुरणे याने पिस्तुलांचे हस्तांतरण केले होते. त्यामुळे या दोघांना शहरातील काही घटनास्थळी प्रत्यक्ष नेऊन माहिती घेतली जाणार आहे. तपासाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. हत्येपूर्वी मारेकऱ्यांची बैठक झाली होती. ती कोल्हापुरात की अन्य ठिकाणी झाली होती, यासंदर्भात संशयित सूर्यवंशी आणि कुरणे यांच्याकडे चौकशी केली जात आहे. तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रश्नावली तयार केली आहे. दोघांना स्वतंत्र खोलीत ठेवून विचारपूस केली जात आहे. कोल्हापूर शहरात यापूर्वी कधी आला होता. कुठे राहत होता, स्थानिक कोणाशी संबंध होते. पिस्तूल कुठे ठेवली, दुचाकी कुठे नष्ट केली, याची विचारपूस केली जात आहे; मात्र दोघेही पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत आहेत.