डॉक्टर ते आयर्नमॅन : जळगावच्या सुपुत्राचा अटकेपार  झेंडा !

बहारिन : वृत्तसंस्था – जगात सर्वात खडतर समजली जाणारी बहारिनमधील ट्रायथलॉन स्पर्धा यंदा  डॉ. पराग टापरे यांनी  जिंकली आहे.अकोला येथे बाल शल्यचिकित्सक म्हणून रुग्णसेवा देणारे पराग यांनी ‘आयर्नमॅन’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केला आहे.

बहारिन येथे पार पडलेल्या क्रिडा स्पर्धांमध्ये येथील डॉ. पराग टापरे यांनी भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातून १८२ देशातील १५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. बहारिन हे दुबई पासून थोड्या अंतरावर आहे. येथील मनामा नावाच्या गावामध्ये ही स्पर्धा पार पडली. ह्या स्पर्धेत डॉ. पराग टापरे यांनी प्रत्येक स्पर्धा प्रकार निर्देशित वेळेच्या आत पूर्ण करून तिन्ही स्पर्धा प्रकारांसाठी   ७ तास ११ मिनिटांची वेळ नोंदवून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. या विजयासाठी त्यांना कुटूंबासह मित्र परिवाराचे सहकार्य लाभले. त्यांच्या या कामगिरीने जळगाव जामोद तालुक्याचेच नाहीतर महाराष्ट्रासह देशाचेही नाव उंचावले आहे.

डॉ. पराग टापरे म्हणाले की , “दररोजची नियमित कामे, व्यवसाय, नोकरी हे तर करावेच लागेल. मात्र यामधूनही दररोज थोडा वेळ काढा. आरोग्याच्या जोपासनेसाठी आवश्यक व्यायाम, चांगला पोषक आहार घेणे आवश्यक आहे.”आहारात फळे, ताजा भाजीपाला घ्यायला पाहीजे असे आवाहनही यानिमित्ताने डॉ. पराग टापरे यांनी तरूणांना केले आहे.डॉ. पराग टापरे ह्यांनी सर्वप्रथम त्यांच्या यशस्वीतेसाठी  मदत केलेल्या सर्व मित्र परिवाराचे आभार मानले. विशेषत: डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. जुगल चीराणिया , नागपूरचे डॉ. अभिनव कोन्हेर आणि नागपूर येथील सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रायथेलोनपटू व कोच डॉ. अमित समर्थ ह्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

असे आहेत स्पर्धेचे नियम –
ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं.

या क्रिडा प्रकारात स्पर्धकाला ३ वेगवेगळ्या क्रीडांमध्ये सहभागी व्हावे लागते.विशिष्ट वेळात प्रत्येक स्पर्धा संपवून पुढील प्रकारासाठी सहभागी व्हावे लागते. यामध्ये सर्वप्रथम २ किमी अंतर पोहावे लागते आणि तेही समुद्रात. यासाठी केवळ ७० मिनिटांचा वेळ दिलेला असतो. पोहणे संपल्यावर ताबडतोब ९० किमी अंतर सायकल चालवावी लागते. त्यासाठी ३ तास २० मिनिटे एवढा वेळ दिला जातो. हे संपल्या संपल्याच २१ किमी अंतर ३ तासात धावून जावे लागते. असे या स्पधेर्चे स्वरूप आहे. यावरून ही स्पर्धा किती खडतर आहे ह्याची  कल्पनाच न केलेली बरी.

अशी केली परीक्षेची तयारी –
या स्पर्धेची तयारी डॉ. पराग यांनी  जवळजवळ १ वर्ष आधीपासून केली होती. त्यात आठवड्यातील ६ दिवस आपला व्यवसाय सांभाळून २ ते ३ तास, त्यातील रविवारी ५ ते ६ तास प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण त्यांनी आॅनलाईन पद्धतीने अकोल्यात तर वेळ असल्यास  सुटीच्या दिवशी नागपूरला जावून घेतले. या प्रशिक्षणामध्ये वॉर्म अप, पोहण्याचे, सायकलिंग चे ड्रीलस, सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग इत्यादी चा समावेश होता. कारंजा, खामगाव येथे जावून पोहण्याचा सराव केला. ह्या सर्व प्रशिक्षणादरम्यान संतुलित व पोषक आहारावर  विशिष्ट लक्ष्य देवून समतोल आहार ज्यात प्रथिने आणि पिष्टमय पदार्थांवर जास्त भर दिला. अशा क्रीडा प्रकारामध्ये फक्त शारीरिक क्षमताच नाही तर  मानसिक क्षमताही पणाला लागलेली असते.