चंद्रकांत पाटील कोल्‍हापुरातून लढणार ?

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा राजकीय पक्षांच्या हालचालींंना वेग येताना दिसत आहे. त्यातही युतीबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणमधून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे समजत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकसभेसाठी आवर्जून उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपामधूनच सुरू असल्याचं समजत आहे. काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी असे म्हटले होते की, युती झाली तरी महाडिक यांना मदत करू. शिवाय पाटील यांचा ओढा महाडिक यांच्याकडे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जर चंद्रकांत पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर त्यांना कोल्‍हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. त्यामुळे भाजपाने जर तसा निर्णय घेतला तर पाटील यांची पंचाईत होऊ शकते. असे सर्व असताना आता नेमक्या काय घडामोडी घडतील याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.