‘लोकसभेचं समारांगण’ : चारही जागा जिंकण्यासाठी पवारांची व्यूहरचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (मार्कंडेयानुज धनवाडे) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून जास्तीतजास्त जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मिळाव्यात यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार प्रयत्नशील झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागा जिंकून पुणे हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे हे त्यांना देशभरात दाखवून द्यायचं आहे, यासाठी ते आता सिद्ध झालेत. लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यातून महागठबंधनचे उमेदवार जास्त निवडून येतील अर्थातच त्या राज्याचा महागठबंधनात वरचष्मा राहील. शरद पवारांची प्रधानमंत्री होण्याची मनीषा लपून राहिलेली नाही. प्रधानमंत्रीपदाचे दावेदार म्हणून आपलं नाव पुढं रेटण्यासाठी त्यांच्या पाठीशी त्या प्रमाणात संख्याबळ हवंय. याची जाणीव पवारांना असल्यानं ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशा जिद्दीनं त्यांनी व्युहरचना आखायला सुरुवात केलीय. त्यातूनच त्यांनी आपला निवडणूक न लढविण्याचा वज्रनिर्धार मोडीत काढून माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा विचार जाहीर केलाय.

माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रभाव सोलापूर, सातारा आणि बारामती इथं आहे. त्यामुळं पवारांच्या मतदारसंघाच्या आजूबाजूला असलेल्या मतदारसंघातही पवारांच्या व्यक्तिमत्वाचा फायदा होणार आहे. त्यासाठीच त्यांनी माढा हा मतदारसंघ जाणूनबुजून निवडला आहे. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे, मावळमधून पार्थ पवार तर शिरूरमधून विलास लांडे उमेदवार असतील. शिरूरसाठी मंगलदास बांदल सध्या प्रयत्नशील आहेत, त्यांच्यामागे अजित पवार असल्याचं म्हटलं जातंय पण लांडे यांनी यापूर्वीही शिरूरमधून दोनदा निवडणूक लढविली आहे. त्यांना यांच्या त्या पराभवांचा वचपा काढायचा आहे म्हणून त्यांनी शरद पवारांकडे आग्रह धरलाय. पवारांनीही त्यांना आश्वस्त करीत ‘प्रचाराला लागा’ असं सांगत उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे धुमशान सुरू झालंय. इथं श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत. शिवसेना-भाजप यांची युती जवळपास निश्चित झालीय. त्यामुळं इथून पुन्हा बारणे हेच उमेदवार असतील. त्यामुळं सध्या भाजपेयीं बनलेल्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नीतिन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे की, जर बारणे यांचा पराभव झाला तर आम्हाला जबाबदार धरू नका.’ याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की, पार्थ पवार यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठीच पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादींनी हे राजकारण खेळलं गेलं आहे.

पुणेशहर मतदारसंघ हा आघाडीत काँग्रेसकडं आहे. सुरेश कलमाडी हे आता काँग्रेसपक्षात नसल्याने त्यांचे खंदे समर्थक अभय छाजेड, मोहन जोशी यांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. महापालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. जोशी, छाजेड हे दोघे गेली ४०-४५ वर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने दोघांचा चांगला संपर्क दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी आहेत. अभय छाजेड यांच्या पाठीशी पृथ्वीराज चव्हाण हे भक्कमपणे उभे असल्याचं सांगितलं जातंय. अरविंद शिंदे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार होती पण अचानकपणे माजी मंत्री चिदंबरम यांना ती दिली गेली. ते सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक समजले जातात. त्यामुळं अरविंद शिंदेंची सारी भिस्त सुशीलकुमार यांच्यावर आहे.

गेले दोन दिवस शरद पवार हे बारामती मुक्कामी आहेत. तिथं अनेक इच्छुकांनी भेटी दिल्या आहेत. आघाडीतील पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा बहुजन-मराठा समाजाचा उमेदवार असावा अशी पवारांची इच्छा असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळं अरविंद शिंदे यांनी सुशीलकुमार यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवलाय.