पिस्टल विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदा पिस्टल विक्रीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून ५५ हजार ४०० रुपयांचे पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.१४) रात्री साडेआठच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकात करण्यात आली.

चंदन लक्ष्मीकांत सादरा (वय-२८ रा. चंदननगर, पुणे मुळ रा. मुपो खोणची जि. पुर्व मिदनापुर पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौकामध्ये एक तरुण थांबला असून तो पिस्टल विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलीस नाईक उज्वल मोकाशी व शिवदत्त गायकवाड यांना समजली. पोलिसांनी गायमुख चौकात सापळा रचला असता स्मशानभूमी गेटजवळ एक तरूण संशयीतरित्या आढळून आला. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची पंचासमक्ष त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये कागदात गुंडाळलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल सापडले.
तसेच दोन जीवंत काडतुसे सापडले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक शिवदत्त गायकवाड, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गुरव, पोलीस हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, समीर बागसिराज, उज्वल मोकाशी, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.