शास्तीकर माफ करा, अन्यथा जनता माफ करणार नाही – सचिन साठे 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – “पाच वर्षांपुर्वी लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप आणि सेनेने शहरातील नागरिकांना संपुर्ण शास्तीकर माफीचे तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. या फसव्या आश्वासनाला भुलून शहरातील मतदारांनी भाजपाला लोकसभा, विधानसभा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील बहुमत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील साडेचार वर्षात तीन वेळा पिंपरी चिंचवडमध्ये येऊन शास्तीकर माफ करु अशी घोषणा केली.

मागील महिन्यात चिंचवड मध्ये झालेल्या कार्यक्रमात तर पंधरा दिवसात शास्तीकर माफ करु असे पुन्हा आश्वासन दिले. या घोषणेला देखील आता महिना होत आला. आता जर शास्तीकर माफ केला नाही तर, जनता येत्या निवडणूकीत तुम्हाला माफ करणार नाही” असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी चिखली येथे जनसंपर्क अभियान अंतर्गतील बैठकीत दिला.

शास्तीकर माफी व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या पोकळ घोषणा वारंवार मुख्यमंत्र्यांनी शहरात येऊन केल्या. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत नागरिकांची दिशाभूल करणारा व अन्यायकारक आदेश काढला. त्याचा शंभर मिळकतींना देखील फायदा झाला नाही. मात्र, जाहीरातबाजी, पत्रकबाजी करुन श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी केला. आता जर संपुर्ण शास्तीकर माफीचा निर्णय घेतला नाही तर सुज्ञ मतदार भाजप आणि सेनेला माफ करणार नाहीत, असेही साठे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक समितीचे उपाध्यक्ष राजेंदरसिंग वालिया, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जैस्वाल, संयोजक व सरचिटणीस मुन्सफ खान आणि प्रभाग अध्यक्ष मयूर रोकडे, शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शहर असंघटित कामगार काँग्रेस अध्यक्ष सुंदर कांबळे, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवती काँग्रेस शहर अध्यक्षा विनिता तिवारी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे, युवक सरचिटणीस तुषार पाटील व इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.