पिंपरी पोलीस येताच सराफाने घेतले विष !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – चौकशीसाठी पिंपरी येथील गुन्हे शाखेचे पोलिस पथक येताच नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील तरुण सराफ व्यावसायिकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी सदर सराफाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
मंगळवारी ही घटना घडली. सदर सराफ व्यवसायिकावर नेवासा फाटा येथे उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. चौकशीसाठी संगमनेर पोलीस आल्यानंतर श्रीरामपूर शहरातील सराफ व्यावसायिकांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी दुसरी घटना जिल्ह्यात घडली.
याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील सुजित सुभाष कपिले या सराफाची पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलीस यापूर्वीही त्याच्याकडे चौकशीसाठी येऊन गेलेले होते. मात्र तो सापडत नव्हता. काल 15
जानेवारी रोजी संक्रांतीच्या दिवशी सदर सराफाच्या राहत्या घरी पहाटेच पोलीस येवून धडकले. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे समजताच सदर सराफाने विष प्राशन केले. पोलिस त्याला घेवून नेवासा फाट्याच्या दिशेने येत असतानाच त्याला त्रास
जाणवू लागला. त्याने आपण विष प्राशन केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
 स्थानिक पोलिसांनी सलाबतपूर येथे भेट दिली. सदर तरुणावर उपचार सुरु असून तब्येतीत सुधारणा होत आहे. दरम्यान काल दुपारी नेमके काय घडले, याची माहिती घेण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमराव तांगडे व पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी भेट देवून
संपूर्ण माहिती समजून घेतली. नेवाशाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व उपनिरीक्षक गौतम वाबळे यांनीही भेट देवून माहिती घेतली.
या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी पिंपरी क्राइम ब्रँचचे पोलीस कर्मचारी हर्षल विलास कदम (वय 30, रा. कोथरुड, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सुजित
सुभाष कपिले (रा. सलाबतपूर ता. नेवासा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले की, कदम हे पोलीस स्टाफसह अटक आरोपी व साक्षीदार यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे दाखल गुन्ह्यातील व पुणे शहरातील इतर ठिकाणी झालेल्या चैन चोरीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचे दागिने हे सुजित कपिले यास आरोपीने दिले असल्याचे सांगितले. त्यावरून गुन्ह्याच्या चोरीस गेलेल्या मालासंदर्भात अधिक चौकशीसाठी त्यास पिंपरी क्राईम ब्रँचच्या कार्यालयात हजर राहणेकामी नोटीस देण्याकरीता गेले होते. त्यावेळी सुजित कपिले याने सरकारी कामात अडथळा म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला, असा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.