महत्वाच्या बातम्या

झांबरे चावडीचे नियोजित स्टेशन

मेट्रोसाठी कळीचा प्रश्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन ( राजेंद्र पंढरपुरे ) – मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील कसबा पेठेतील झांबरे चावडी नियोजित स्टेशन प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरला आहे.

मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा सुमारे पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी होणार आहे. या मार्गावर कसबा पेठेत फडके हौद चौकालगत झांबरे चावडी परिसर आहे. याठिकाणी मेट्रोचे स्टेशन प्रस्तावित आहे. याकरिता महापालिका शाळा क्रमांक ८, हुतात्मा भाई कोतवाल मंडई लगतचा एक वाडा आणि झांबरे चावडी परिसरातील मिळकतीची जागा संपादित करण्यात येणार आहे. यासाठी मेट्रोने संबंधित जागा मालक, भाडेकरू आणि फ्लॅटधारक यांना नोटीसा बजाविल्या आहेत. जागा सोडण्याच्या बदल्यात रक्कम किंवा पर्यायी जागा असा प्रस्ताव दिला आहे. भाडेकरूंना रक्कमेचा प्रस्ताव मंजूर नाही आणि पर्यायी जागेबाबत अविश्वासाची भावना आहे. यातून झांबरे चावडी परिसरात मेट्रो स्टेशन नको अशी मागणी जोर पकडत आहे. नुकतेच नागरिकांचे आंदोलनही झाले. भाजप वगळता सर्वच पक्ष त्यात सामील झाले होते.

मेट्रो स्टेशनसाठी झांबरे चावडीची जागा अव्यवहार्य असे मत एका जबाबदार अभ्यासकाने व्यक्त केले. या ठिकाणी विस्थापितांच्या पुनर्वसनाचा खर्च वाढू शकतो आणि मेट्रोला प्रवासी मिळण्याच्या दृष्टीने ही जागा अव्यवहार्य आहे. इंजिनिअरींग कॉलेजनंतर ज्याला शहराच्या मध्यवस्तीत उतरायचे आहे त्याला झांबरे चावडी स्टेशन कोणत्याच बाजूने सोयीचे नाही, त्याऐवजी मंडई जवळ हुतात्मा बाबू गेनू चौक येथे स्टेशन करावे, अशी सूचना केली जात आहे.

मात्र याकरिता मेट्रोचा भुयारी मार्ग शनिवारवाडा आणि लाल महाल या दोन ऐतिहासिक वास्तू जवळून न्यावा लागेल. पुरातत्त्व विभागाचे नियम अन्य लोकांची तसेच तज्ज्ञांची मते, नियम विचारात घ्यावे लागतील.

झांबरे चावडी येथेच मेट्रो स्टेशन करणे अनिवार्य ठरले तर काय करायचे ? असा प्रश्न उरतोच. भुयारी मार्गासाठी खोदाईचे काम सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. शिवाजीनगर गोदाम आणि स्वारगेट अशा दोन्ही बाजूने खोदाई होईल. हे काम सुरू होऊन कसबा पेठेपर्यंत येण्यास काही कालावधी लागेल. साधारणतः आजपासून सव्वा वर्ष लागतील. एवढया काळात महापालिकेने आठ नंबरची शाळा आणि तेथील लगतची हुतात्मा भाई कोतवाल भाजी मंडई या जागा ताब्यात घेऊन तिथे इमारत उभी करावी आणि कायदेशीर प्रक्रिया करून ज्यांना या इमारतीत स्थलांतरित व्हायचे आहे त्यांचे पुनर्वसन करावे आणि मगच स्टेशनचे काम सुरू करावे अशा सूचना जाणकारांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या आहेत.

मेट्रो प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि रहिवासी यांना एकत्र बसूनच व्यवहार्य आणि कोणावरही अन्याय होणार नाही असा तोडगा काढावा लागेल.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या