पब्जीचा खेळ बेतला भाऊजीच्या जीवावर 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याणमध्ये एका तरुणाने पब्जी खेळण्याच्या वादातून आपल्या बहिणीच्या भावी पतीवर जीवघेणा हल्ला केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर 6 दिवसांनी पोलिसांना गुन्हा नोंदवण्यासाठी जाग आली असून आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.

अंबरनाथच्या लोकनगरी भागात राहणाऱ्या ओम बावधनकर यांचे कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका मुलीशी लग्न ठरले होते. आणि साखरपुडाही झाला होता. 7 फेब्रुवारी रोजी ओम हा त्याच्या भावी पत्नीच्या घरी आला होता. त्यावेळी तिचा भाऊ पब्जी गेम खेळत असताना त्याच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळे त्याने चार्जर घेतले असता चार्जरची वायर घरातल्या पाळीव कुत्र्याने खाल्ल्याचे त्याला दिसले. हे कुत्रे ओमच्या भावी पत्नीने पाळलेले असल्याने भावा-बहिणींमध्ये जोरदार वाद झाला. त्यातच संतापलेल्या भावाने  किचनमधून चाकू आणून बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापून टाकली. यामुळे ओमने त्याला जाब विचारला असता त्याने ओमच्या पोटावर चाकूने वार केले.

या घटनेनंतर ओमवर आधी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल आणि मग कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र 7 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडूनही कोळसेवाडी पोलिसांनी 6 दिवसांनी गुन्हा दाखल केला. तर त्यानंतर तीन दिवस उलटूनही गेले. तरीही अद्याप आरोपी मेहुण्याला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे कोळसेवाडी पोलीस मॅनेज झाले आहेत का? असा प्रश्न जखमी ओम बावधनकर यांनी विचारला आहे. तर पोलिसांनी मात्र तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगत कारवाईचे  आश्वासन दिले आहे.