आण्विक हल्ल्याची भीती दाखवून जगाला ब्लॅकमेल करणाऱ्यांसाठी INS अरिहंत हे चोख प्रत्युत्तर : मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी आण्विक पाणबुडी असलेल्या INS अरिहंत टीमला भेट दिली आहे. विशेष म्हणजे आण्विक हल्ल्यांची धमकी देणाऱ्यांना INS अरिहंत हे चोख प्रत्युत्तर असल्याचंही माेदींकडून सांगण्यात आलं आहे. INS अरिहंत ही पाणबुडी डेटरेंस पेट्रोल (टेहाळणी) करून परतली आहे. पाणबुडीच्या अभ्यासानं भारताच्या नाभिकीय त्रिकोणा(Nuclear Triad)ची स्थापना झाली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरिहंत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  “सध्याच्या घडीला आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असणं गरजेचं आहे. जे देश आण्विक हल्ल्याची भीती दाखवून जगाला ब्लॅकमेल करत आहेत, त्यांच्यासाठी आयएनएस अरिहंत हे चोख प्रत्युत्तर आहे. ज्या देशांना पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत आहे, अशा देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.”
“आयएनएस अरिहंतमुळे धनत्रयोदशी आणखी खास झाली आहे. कारण देशात पाणबुडीचं निर्माण आणि त्याचं संचालन करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाल्यानंतर भारताचा ख-या अर्थानं विकास होणार आहे. तसेच तंत्रज्ञान आणि संबंधित संस्थांमध्ये असलेल्या समन्वयाचं हे चांगलं उदाहरण आहे.” असेही ते म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे “आयएनएस अरिहंतचं यश हे भारत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आयएनएस अरिहंतचं यश हे पूर्ण देशाचे आहे. इतकच नाही तर आयएनएस अरिहंतनं पहिली (डेटरेंस पेट्रोल)टेहळणी पूर्ण केल्याबद्दल भारताला गर्व आहे. हा दिवस इतिहासात लक्षात ठेवला जाईल.” असेही ते म्हणाले,
अरिहंत देशातल्या 130 कोटी जनतेचे बाह्य शक्तींपासून संरक्षण करणार आहे. तसेच समुद्राच्या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यात INS अरिहंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.