आता कसे वाचता तेच पाहतो, मोदींचा राहुल व सोनिया गांधींना थेट इशारा

सुमेरपूर : वृत्तसंस्था – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकलो आहोत. केंद्र सरकारला सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या प्राप्तिकराचे पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार असून, आता कसे वाचता तेच पाहतो, असा थेट इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नाडिस यांच्या २०११-१२ या वर्षांतील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे. राजस्थानच्या सुमेरपूर येथे मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. काँग्रेसवर जोरदार टीका करताना मोदी म्हणाले, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकलो आहोत. हा प्रामाणिकपणाचा विजय आहे. चार पिढ्या देश चालवणाऱ्या कुटुंबाला एका चायवाल्याच्या धैर्याने न्यायालयाच्या दारात आणून उभे केले आहे. आता यातून कसे वाचता तेच बघतो, असे मोदी म्हणाले.

तीन हजार ६०० कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरूनही काँग्रेसला लक्ष्य करत मोदी म्हणाले, हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाला दुबईवरून भारतात आणण्यात यश आले आहे. आता बड्या लोकांचे बिंग फुटणार असून, संपूर्ण कुटुंबाचे धाबे दणाणले आहे. ही गोष्ट कुठवर जाईल काहीच माहीत नाही.

राजस्थानमध्ये मी जिथेही जातोय, तेथील चित्र पाहून राजस्थानच्या नागरिकांनी पुन्हा भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसते. जे लोक २०१४ मध्ये मोदींच्या पराभवाच्या प्रतीक्षेत होते, मोदींचा पराभव झाल्यानंतर ज्यांना आनंदोत्सव करायचा होता, त्या टोळीची नागरिकांनी निराशा केली, असे मोदी म्हणाले.